स्वतः केंद्रीय मंत्र्यांच्याची मुलीची अशापद्धतीने छेड काढली जात असेल तर राज्यातील सामान्य महिलांचं काय? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.
28 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
या प्रकरणात एकूण सात जणांवर पोक्सोअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, तर अनिकेत भोई या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाबाबत बोलताना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, "परवा (28 फेब्रुवारी) रात्री जी काही घटना घडली तिथे माझी मुलगी उपस्थित होती. त्यामुळे आज (2 मार्च) मी एक मंत्री म्हणून नाही तर एक आई म्हणून पोलीस स्टेशनला आले आहे. त्यादिवशी माझ्या मुलीसोबत सतरा-अठरा वर्षांच्या मुली होत्या. त्याठिकाणी अनिकेत भोई आणि इतर मुलांनी त्यांचा पाठलाग केला. माझ्या मुलींसोबत असलेल्या लोकांवर या मुलांनी दादागिरी केली.
"जर मंत्र्यांच्या मुलींसोबत असं घडत असेल तर बाकीच्या मुलींचा तर आपण विचारच करू शकत नाही. या टोळीला कठीण शिक्षा झालीच पाहिजे. मी आजच्या आज सगळ्यांना अटक करायला लावली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत देखील मी बोललेली आहे."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छेडछाड करणारे आरोपी 'विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते' असल्याचं म्हटलं आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना आता केंद्रीय राज्यमंत्र्यांच्याच मुलीची छेड काढली गेल्याने या प्रकरणाची देशभर चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत झालेल्या छेडछाडीबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "दुर्दैवाने छेडछाड करणाऱ्यांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत. ज्यांनी अतिशय वाईट अशाप्रकारचं काम केलेलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, यापैकी काहींना अटक केलेली आहे.
"इतरांनाही अटक केली जाईल पण अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणं, मुलींना त्रास देणं हे अत्यंत चुकीचं आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल."
याबाबत बोलताना मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे म्हणाले, "28 फेब्रुवारी 2025 रोजी मुक्ताईनगरच्या कोथळी गावात यात्रा होती. या यात्रेत मुक्ताईनगर शहरात राहणारे अनिकेत भोई आणि त्याच्या सहा साथीदारांनी 3-4 मुलींची पाठलाग करून छेड काढली.
"अनिकेत आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात पाठलाग करणे, विनयभंग करणे आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आयटी अ ॅक्टनुसार देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत."
छेडछाड करणारे कोणत्या राजकीय पक्षाचे? यावरून आरोप प्रत्यारोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छेडछाड करणारे आरोपी एका 'विशिष्ट' पक्षाचे असल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, हे आरोप शिंदे गटाच्या आमदारांचे कार्यकर्ते आहेत.
रोहिणी खडसे म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्यात असे म्हटले आहे की, आरोपी एका विशिष्ट पक्षाचे आहेत. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आरोपींचे एकनाथ शिंदे यांच्या सोबत फोटो आहेत. मला देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करायचे आहेत की, आरोपी सत्ताधारी पक्षाचे जरी कार्यकर्ते असले तरी त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. पण कारवाईचे आदेश देण्यापेक्षा लवकरात लवकर त्या मुलींना न्याय देण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना घडवू नये, यासाठी देखील देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करणे अपेक्षित आहे."
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी देखील याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, "ज्यांनी छेडछाड केली ते निव्वळ टवाळखोर नाही तर गुंड आहेत. मुलींसोबत असलेल्या पोलिसांनी त्या गुंडाना अडवण्याचा प्रयत्न केला पण या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली. राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांनंतर मुली पोलीस ठाण्यात जायला घाबरतात. मी माझ्या नातीला सांगितलं की तू स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार कर. आपण कुणालाही घाबरता कामा नये."
काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी या घटनेनंतर सरकारवर टीका केली आहे.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून वडेट्टीवार म्हणाले आहेत की, "पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची ही बातमी महाराष्ट्रातील वास्तव आहे!
पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुली आज महाराष्ट्रात सुखरूप नाही तिथे शेतात, नोकरीवर जाणाऱ्या सामान्य आई वडिलांच्या मुली दररोज स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय 'स्ट्रगल' करत असतील आणि किती मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागत असेल हा अंदाज महायुतीतील मंत्र्यांना नाही.
आरोपींना पकडण्यासाठी मंत्र्यांना थेट पोलिस स्टेशन गाठावे लागले.आम्ही कधीपासून सांगत आहोत राज्यात पोलिसांचा धाक राहिला नाही कारण गुंडाना महायुतीचे राजकीय संरक्षण मिळते.
लाडक्या बहिण म्हणून मिरवणाऱ्या महायुती सरकारला त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी आरसा दाखवला आहे.आता तरी मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री जागे होणार आहेत का?"
Comments
Leave a Comment