नव्यानं सापडलेला 'हा' लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची किती शक्यता? शास्त्रज्ञांचं काय म्हणणं आहे?

Facebook Twitter LinkedIn
नव्यानं सापडलेला 'हा' लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची किती शक्यता? शास्त्रज्ञांचं काय म्हणणं आहे?

हा लघुग्रह कोणता आहे, त्याचा आकार किती आहे आणि त्याच्या धडकेमुळे पृथ्वीवर काय विनाश होऊ शकतो यासह एकूण पृथ्वीच्या वाटेला जाणाऱ्या लघुग्रहांची माहिती देणारा हा लेख.

या आठवड्यात 2024 YR4 नावाचा एका मोठा लघुग्रह (Asteroid) प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. कारण वैज्ञानिकांनी आधी हा लघुग्रह पृथ्वीवर आदळेल अशी शक्यता वर्तवली आणि नंतर तसं होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं.

ताज्या अंदाजानुसार, हा लघुग्रह (Asteroid) 2032 मध्ये पृथ्वीवर आदळण्याची 0.28 टक्के शक्यता आहे. तर या आठवड्याच्या सुरुवातीला मात्र अशी शक्यता 3.1 टक्के असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्या तुलनेत आता हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता कमी झाली आहे.

वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, आता तो चंद्रावर आदळण्याची शक्यता अधिक आहे. नासाचा अंदाज आहे की असं होण्याची शक्यता एक टक्के आहे.

दोन महिन्यांपूर्वी चिलीच्या वाळवंटात असणाऱ्या दुर्बिणीतून 2024 YR4 हा लघुग्रह पहिल्यांदा दिसला होता. तो दिसल्याची नोंद झाल्यापासून चंद्रावर धडकण्याऐवजी पृथ्वीजवळून असंख्य लघुग्रह आणि अवकाशातील इतर वस्तू गेल्या आहेत. खगोलशास्त्राच्या दृष्टीनं विचार करता त्याची पृथ्वीशी होणारी धडक थोडक्यात टळली आहे.

मात्र, अवकाशातील या वस्तूंची पृथ्वीवर होणारी धडक सतत टळतच असते असं अजिबात नाही.

यादरम्यान आकारानं खूपच लहान असलेल्या अनेक वस्तू पृथ्वीवर आदळल्या असतील किंवा पृथ्वीच्या वातावरणात शिरल्या असतील. पृथ्वीभोवतीच्या वातावरणात घर्षण होत त्या आकाशातच जळून गेल्या असतील. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असेल.

तुम्ही कधीही न ऐकलेल्या लघुग्रहांची ही कहाणी आहे. पृथ्वीच्या अगदी जवळून गेलेल्या, पृथ्वीशी होणारी धडक थोडक्यात वाचलेल्या आणि पृथ्वीवर आदळल्याची कहाणी.

लघुग्रहांचा धोका आणि अवकाश निरीक्षण

महत्त्वाचं म्हणजे अवकाशातून येणाऱ्या या वस्तू किंवा लघुग्रहांपैकी बहुतांश आपल्यादृष्टीनं निरुपद्रवी आहेत. अवकाशातील या वस्तूंचा पृथ्वीवर धडकणं आणि पृथ्वीचं नुकसान होणं किंवा ती धडक टळणं एवढ्यापुरतीच संबंध नाही.

यातील काहींमध्ये आपल्या विश्वातील अनेक रहस्यं उलगड्यासाठी उपयुक्त ठरणारी अतिशय महत्त्वाची किंवा मौल्यवान माहिती असते. ही तीच माहिती असते जी मिळवण्यासाठी मानवजात अतिशय उत्सुक असते.

या अॅस्टेरॉईड्स म्हणजे लघुग्रहांना कधीकधी छोटे ग्रहदेखील म्हटलं जातं. जवळपास 4.6 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सूर्यमालेची निर्मिती होत असताना उरलेले हे छोटे खडकाळ तुकडे आहेत.

हे खडक, आपल्या सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या जवळून नियमितपणे फिरतात.

मानवजातीच्या इतिहासात अशा एखाद्या मोठ्या लघुग्रहाशी धडक होण्याच्या आपण किती जवळ आलो होतो, हे जाणून घेणं अशक्य आहे.

कारण लाखो-कोट्यवधी वर्षे पृथ्वीभोवती आणि अंतराळात काय होत होतं याची अर्थातच नोंद नाही. पृथ्वीजवळील वस्तूंचं गांभीर्यानं निरीक्षण, अवकाशाबाबतच्या सखोल नोंदी इत्यादी बाबी 20 व्या शतकाच्या उत्तरार्धातच सुरू झाल्या, असं प्राध्यापक मार्क बॉस्लो सांगतात.

ते म्हणतात, "त्यापूर्वी या गंभीर आणि घातक गोष्टींकडे आपण आनंदानं दुर्लक्ष करत होतो."

मात्र आता आपल्याला हे माहित आहे की अवकाशातील हे खडक किंवा लघुग्रह म्हणजे तशा बऱ्याच मोठ्या वस्तू असतात. त्या 40 मीटर किंवा त्याहून अधिक व्यासाच्या असतात. वर्षातून अनेकवेळा ते पृथ्वी आणि चंद्रामधून जात असतात.

याच आकाराचा लघुग्रह 1908 मध्ये सैबेरियामध्ये (रशिया) आदळत त्याचा स्फोट झाला होता. त्यामुळे जवळपास 200 चौ. मैलांपेक्षा जास्त क्षेत्रफळातील इमारतींचं नुकसान झालं होतं आणि लोक जखमी झाले होते.

पृथ्वीशी टक्कर होता होता थोडक्यात वाचलेले आणि YR4 शी जवळून तुलना करता येणारा अपोफिस (Apophis) हा लघुग्रह 2004 मध्ये पहिल्यांदा आढळला होता. तो 375 मीटर व्यासाचा किंवा जवळपास एखाद्या क्रुझ जहाजाच्या आकाराचा होता.

फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च (CNRS)चे प्राध्यापक पॅट्रिक मिशेल यांनी अपोफिस लघुग्रहाचा मागोवा घेतला होता. ते सांगतात की तो आजवर आढळलेला सर्वात धोकादायक किंवा विनाशकारी लघुग्रह असल्याचं मानलं जातं.

तो लुघग्रह पृथ्वीवर आदळणार नाही हे समजण्यासाठीचं पुरेसं निरीक्षण होण्यासाठी 2013 साल उजडावं लागलं.

मात्र ते म्हणतात की हा लघुग्रह आणि YR4 या लुघग्रहात एक मोठा फरक होता.

"त्यावेळेस काय करायचे हे आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला काहीतरी सापडलं होतं, आम्ही तो लघुग्रह आदळल्यानं होणाऱ्या आघाताची शक्यता निश्चित केली होती आणि मग आम्ही विचार केला की आता कोणाला सांगायचं?" असं ते म्हणतात.

वैज्ञानिक आणि सरकारांना या संकटाला कसं तोंड द्यायचं याची कल्पना नव्हती, असं ते म्हणतात.

YR4 च्या धडकेचा धोका आणि संभाव्य उपाययोजना

YR4 हा लघुग्रह आकारानं किती मोठा आहे हे आपल्याला नक्की माहित नाही. मात्र जर तो व्यक्त केल्या जात असलेल्या अंदाजानुसार मोठ्या आकाराचा असेल, म्हणजेच जवळपास 90 मीटर व्यासाचा असेल, तर पृथ्वीच्या वातावरणात शिरताना त्याचे तुकडे होण्याऐवजी तो बराचसा अबाधित राहण्याची शक्यता आहे.

"त्यानंतर लघुग्रहाचा जेवढा भाग पृथ्वीवर आदळेल त्यामुळे एक विवर तयार होऊ शकतं. त्या ठिकाणाच्या जवळपासच्या परिसरातील सर्व इमारती, बांधकामं नष्ट होण्याची शक्यता आहे. तर लघुग्रह धडकण्याचा ठिकाणापासून काही डझन किलोमीटर परिसरातील लोकांना गंभीर दुखापत होऊ शकते," असं प्राध्यापक कॅथरिन कुनामोटो म्हणतात. ते लॉरेन्स लिव्हरमोअर नॅशनल लॅबोरेटरीत संशोधन करतात. ते म्हणतात की काही लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

मात्र अपोफिस लघुग्रह दिसल्यापासून आतापर्यंत अवकाशातील लघुग्रह, उल्का इत्यादीपासून पृथ्वीला असणाऱ्या धोक्यापासून संरक्षण करण्यासंदर्भात (planetary defence) मोठी प्रगती झाली आहे.

प्राध्यापक मिशेल, आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिम नियोजन सल्लागार गटाचे (international Space Mission Planning Advisory Group) सदस्य आहेत.

या संस्थेचे प्रतिनिधी, लघुग्रहांपासून पृथ्वीला असलेल्या धोक्यांना कसं तोंड द्यायचं आणि पृथ्वीला होणाऱ्या थेट धडकांसंदर्भात सराव कसा करायचा याबद्दल सरकारला सल्ला देतात.

असाच एक सराव सध्या सुरू आहे.

जर अवकाशातील लघुग्रह पृथ्वीवरील एखाद्या शहराच्या दिशेनं येत असेल तर डॉ. बॉस्लो त्याला तोंड देताना केल्या जाणाऱ्या तयारीची तुलना मोठ्या चक्रीवादळासाठी केलेल्या तयारीशी करतात. यात लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं आणि पायाभूत सुविधांचं संरक्षण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा समावेश आहे.

YR4 लघुग्रहाबाबत काय करायचं यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिम नियोजन सल्लागार गटाची एप्रिलमध्ये बैठक होणार आहे.

तोपर्यंत या लघुग्रहामुळे निर्माण झालेला धोका जवळपास पूर्णपणे संपलेला असेल अशी बहुतांश वैज्ञानिकांची अपेक्षा आहे. कारण तोपर्यंत या लघुग्रहाच्या मार्गक्रमणासंदर्भातील त्यांची गणना अधिक अचूक होत जाईल.

नासा आणि इतर अवकाश संस्थांचे प्रयत्न

डॉ. कुमामोटो म्हणतात त्याप्रमाणे, आघातातून होणारा "विनाश किंवा नुकसान सहन करण्यापलीकडे" आपल्याकडे इतर पर्याय आहेत.

अर्थात नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीनं धोकादायक लघुग्रहांना मार्गातून हटवण्यासाठी किंवा पृथ्वीवर येऊन धडकण्याआधीच त्यांचा मार्ग बदलण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलं आहे.

नासाच्या दुहेरी लघुग्रह पुनर्निदेशन चाचणीनं (Double Asteroid Redirection Test) (DART) डिमॉर्फोस या लघुग्रहावर एका अंतराळयानाला आदळवून त्या लघुग्रहाचा मार्ग बदलण्यात यश मिळवलं.

मात्र हा पर्याय YR4 या लघुग्रहाच्या बाबतीत उपयुक्त ठरेल की नाही याबद्दल वैज्ञानिक साशंक आहेत. कारण तो लघुग्रह कशापासून बनलेला आहे याबद्दल असलेली अनिश्चितता आणि त्याचा मार्ग यशस्वीरित्या बदलण्यासाठी अतिशय कमी वेळ असल्यामुळे ही शंका वाटते आहे.

मग पृथ्वीवर आदळणाऱ्या लघुग्रहांचं काय? वैज्ञानिकांच्या संदर्भातील एक विचित्र सत्य म्हणजे, मानवी वस्त्यांपासून दूर असलेल्या जमिनीवर थेट आदळणं ही लघुग्रहांच्या धडकेसाठीची आदर्श स्थिती आहे.

अशा प्रकारच्या धडकेमुळे वैज्ञानिकांना आपल्या सूर्यमालेतील दूरवरच्या वस्तूंचे प्रत्यक्ष तुकडे मिळतात. त्याचबरोबर पृथ्वीवर यापूर्वी झालेल्या आघातांची माहिती मिळते.

लघुग्रहांमुळे मिळणारी अवकाशाची अमूल्य माहिती

अंटार्टिकामध्ये जवळपास 50,000 लघुग्रह सापडले आहेत. यातील सर्वात प्रसिद्ध लघुग्रह म्हणजे ALH 84001. या लघुग्रहाचा उगम मंगळ ग्रहावर झाला असल्याचं मानलं जातं.

यात त्या ग्रहावरील खनिजांबरोबर ग्रहाच्या इतिहासाबद्दलचे महत्त्वाचे पुरावे आहेत. त्यातून अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळ ग्रह उबदार होता आणि त्याच्या पृष्ठभागावर पाणी असल्याची माहिती मिळते.

2023 मध्ये वैज्ञानिकांनी 33 पॉलीहिम्निया (33 Polyhymnia) नावाचा लघुग्रह शोधला. त्यात पृथ्वीवर आढळणाऱ्या इतर कोणत्याही घटकापेक्षा जास्त घनता असलेलं मूलद्रव्यं असू शकतं.

हे प्रचंड घनता असलेलं मूलद्रव्यं आपल्या ग्रहासाठी पूर्णपणे नवीन असेल. 33 पॉलीहिम्निया लघुग्रह आपल्यापासून किमान 17 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. मात्र त्यातून विज्ञानाबद्दलच्या आपल्या आकलनासंदर्भातील लघुग्रहांमध्ये दडलेल्या माहितीची प्रचंड क्षमता सूचित होते.

आता YR4 हा लघुग्रह पृथ्वीपेक्षा चंद्रावर आदळण्याची शक्यता अधिक असल्यानं, काही वैज्ञानिक त्याबद्दल उत्सुक आहेत.

लघुग्रहाच्या या धडकेमधून अशा काही प्रश्नांची वास्तवदर्शी उत्तरं मिळू शकतील जी एरवी फक्त संगणकाद्वारे आभास निर्माण करूनच मिळू शकली होती.

"प्रत्यक्षातील एखाद्या उदाहरणातून मिळालेली एखादी माहितीदेखील प्रचंड महत्त्वाची असेल," असं प्राध्यापक गॅरेथ कॉलिन्स म्हणतात. ते इम्पीरियल कॉलेज लंडनमध्ये प्राध्यापक आहेत.

"जेव्हा एखादा लघुग्रह आदळतो तेव्हा त्यातून किती पदार्थ बाहेर पडतो? तो किती वेगानं बाहेर पडतो? तो किती दूरवर जातो?" असं ते विचारतात.

पृथ्वीवर लघुग्रह आदळल्यानंतर होणाऱ्या परिणामांबाबत वैज्ञानिकांनी तयार केलेल्या आभासी परिस्थितीची चाचणी करण्यास ते उपयोगी ठरेल. त्यामुळे अशा धडकांबद्दल अधिक चांगला अंदाज वर्तवण्यास मदत होईल.

YR4 या लघुग्रहानं आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून दिली आहे. ती म्हणजे, आपली सूर्यमाला खडकांनी भरलेली आहे आणि आपण अशा ग्रहावर आपण राहतो, ज्याला या खडकांपासून होणाऱ्या धडकांचा धोका आहे.

अशा आत्मसंतुष्टपणाबद्दल वैज्ञानिक इशारा देत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या मोठ्या आकाराच्या लघुग्रहाच्या धडकेमुळे पृथ्वीवरील मानवजातीला धोका कधी निर्माण होईल, हा प्रश्न आहे. जरी बहुतांश जणांना असं वाटतं की ते काही दशकांमध्ये नाही तर आगामी शतकांमध्ये होईल.

दरम्यान, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अवकाशाचं निरीक्षण करण्याची आपली क्षमता वाढते आहे. या वर्षाच्या अखेरीस चिलीतील वेरा रुबिन वेधशाळेत, आतापर्यंतचा सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा काम करण्यास सुरुवात करेल.

हा कॅमेरा रात्रीच्या आकाशात अविश्वसनीय स्वरुपाच्या नोंदी करण्यास सक्षम असेल.

यातील महत्त्वाची बाब म्हणजे, आपण अवकाशाचं निरीक्षण जितकं जवळून आणि जितका अधिक काळ करू, तितकेच आपल्याला पृथ्वीजवळ फिरणारे आणखी लघुग्रह सापडण्याची शक्यता असते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

admin

admin

Content creator at LTD News. Passionate about delivering high-quality news and stories.

Comments

Leave a Comment

Be the first to comment on this article!
loader